Chandrayaan-3 | मायनस तापमानातही कॅमेरे काम करणार, आधी विक्रम लँडर चंद्रावर उतरणार, नंतर…

   
मोफत बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा Join Now

येत्या काही तासातच भारत चंद्राला गवसणी घालणार आहे. सारं जग भारताच्या या कामगिरीचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झालंय. चंद्राच्या 25 किलोमीटर जवळ पोहोचल्यानंतरचा यानाचा पुढचा प्रवास सर्वात महत्वाचा असणार आहे.

यान जेव्हा कक्षा कमी करत-करत चंद्राच्या अतिशय जवळ येईल. तेव्हा सर्वात आव्हानात्मक असेल ते यानाची दिशा सरळ करणं कारण यान हे कक्षेत फिरताना आडव्या पद्धतीनं फिरतं. त्याचं कारण यानाचं इंजिन सुरु झाल्यानंतर फिजिक्सच्या नियमाप्रमाणे यान विरुद्ध दिशेला पुढे जातं. त्यामुळे चंद्राभोवतीची प्रदक्षिणा शक्य होते. लँडिंगवेळी यानाची दिशा सरळ करताना मेजरमेंट थोडंही चुकलं, तरी मोहिम धोक्यात येते. समजा यानाला सरळ करताना ते थोडंही डाव्या किंवा उजव्या बाजूला झुकलं, तर सुरु असलेल्या इंजिनमुळे वेगावर परिणाम होतो. म्हणून हा टप्पा सर्वात महत्वाचा असेल.

जेव्हा लँडिंगची वेळ येते, तेव्हा हेच इंजिन पुन्हा सुरु करुन यान चंद्रावर उतरवलं जातं. इंजिन सुरु झाल्यामुळे वेग कमी होतो, ज्यामुळे यान चंद्रावर जोरात आदळून त्याला धोका पोहोचत नाही.

यानाला योग्य अंतरावर सरळ दिशेनं करणं आव्हानात्मक यासाठी आहे, कारण ते सारं काम पृथ्वीवरुन होतं आणि पृथ्वी-चंद्रामधलं अंतर 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे. म्हणजे आपण ३ लाख ८४ हजार किलोमीटर लांब बसून एखाद्या यंत्राला हाताळतोय. चंद्रयान दोनवेळी आपलं यान सरळ दिशेला झालं सुद्धा होतं. मात्र फक्त ३ किलोमीटर अंतर असताना यानाचा संपर्क तुटला आणि यान चंद्रावर जाऊन कोसळलं.

लँडिंग यशस्वी झाल्यानंतर लँडर एकाच जागेवर स्थिर राहील. लँडरमधून रोव्हर बाहेर पडेल आणि याच रोव्हरच्या मदतीनं चंद्राच्या पृष्टभागावर वेगवेगळे प्रयोग होतील. चंद्रावर रोव्हर कसा फिरेल, कोणत्या दिशेनं जाईल, याचं पूर्ण नियंत्रण इस्रोकडे असेल.

यानातील रोव्हरला प्रग्यान नाव दिलं गेलंय. त्याचं 50 वॅट क्षमतेचं सोलर पॅनल आहे. सौरऊर्जेच्या जोरावरच रोव्हर काम करेल. रोव्हरच्या मुख्य बाजूला डावीकडे एक आणि उजवीकडे एक असे दोन कॅमेरे आहेत. कॅमेऱ्यांची खुबी म्हणजे हे मायनस तापमानातही काम करतात. कॅमेऱ्याच्या पुढच्या बाजूला अल्फा पार्टीकल एक्स्र् रे स्प्रेक्र्टोमीटर आहे. याद्वारे लँडिंग साईटची मुलभूत माहिती मिळेल.सोलरच्या वरच्या बाजूला सिग्नल कॅच करणारे दोन अँटिने आहेत. तुम्हाला असाही प्रश्न पडेल की चंद्रावर इतके खड्डे आहेत, त्यात जर रोव्हर अडकला किंवा खड्ड्यांमुळे उलटला तर काय? त्यासाठी इस्रोनं रॉकर बॉगी अस्म्बेली तंत्रज्ञान वापरलंय. हे तंत्रज्ञान एकप्रकारे शॉक ऑर्ब्जर्वरचं काम करतं. यानाचा बॅलेन्स न बिघडू देता ते वाटचाल करतं. यामुळे आपल्या रोव्हरसमोर खड्डा किंवा असमान पृष्टभाग जरी आला तरी रोव्हरचा मुख्यभाग कोणत्याही बाजूला झुकत नाही.आता समजा समोर प्रचंड मोठा खड्डा किंवा असा चढ आला जिथं रोव्हर चढू शकत नाही तर काय, त्यासाठी महत्वाचे ठरतात रोव्हरला लागलेले हे अत्याधुनिक कॅमेरे. रोव्हरच्या प्रत्येक हालचालीआधी कॅमेरे समोरच्या पृष्टभागाचा मध्ये फोटो टिपतात. लँडर किंवा ऑर्बिटरच्या मदतीनं ते फोटो इस्रोच्या सेंटरमध्ये पाठवले जातात. इस्रोतले शास्त्रज्ञ त्या इमेजला 3D मध्ये बदलतात.रोव्हर समोर आलेल्या गोष्टीचा आकार, त्याची उंची किती आहे, समोरची गोष्ट नेमकी काय आहे, याचा अभ्यास केला जातो. त्याच्या सूचना पुन्हा लँडरद्वारे रोव्हरला पाठवल्या जातात, मग रोव्हरला पुढे न्यायचं की मग त्याचा रस्ता बदलायचा याचा निर्णय होतो.